मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या संघाकडूनच दूध खरेदी : भाजपचा आरोप

Foto
जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन
 दूध उत्पादकांना पंचवीस रुपये लिटर भाव देऊ असे आश्वासन देणार्‍या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असून मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडूनच दूध खरेदी केल्या जात आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने अनुदान द्यावे नसता 1 ऑगस्ट पासून राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत भाजपने आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. 
यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, सुरेश कटारे, किशोर थोरात, लक्ष्मण औटे, बाळकृष्ण इंगळे, दामोदर नवपुते आदींची उपस्थिती होती.
शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नाही, नकली सोयाबीन, दुबार पेरणी, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यातही सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांची थट्टा चालवली आहे. लॉक डाउनच्या काळात दूध विक्रीत 30 टक्के घट झाली आहे. दूध संस्था दूध उत्पादक संघ केवळ 15 ते 16 रुपये लिटर दराने दूध खरेदी करत आहेत. त्यात शेतकर्‍यांचा खर्चही निघत नाही. 
शासनाने 25 रुपये लिटर दराने दूध खरेदीची घोषणा केली होती. मात्र या गोष्टीचा सरकारला विसर पडला आहे. गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान तातडीने द्यावे, दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे नसता भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, महायुती येत्या 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध आंदोलन पुकारेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.